मुंबई, दि. ४ नोव्हेंबर २०२५
भारतीय महिला क्रिकेट संघाने नुकताच झालेल्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला असून संपूर्ण देशाचा गौरव वाढवला आहे. या विजयानिमित्त महाराष्ट्र सरकारने राज्यातील तीन खेळाडूंना प्रत्येकी ₹२.२५ कोटींचे पारितोषिक जाहीर केले आहे.
राज्य सरकारच्या क्रीडा धोरणानुसार, महाराष्ट्रातील जेमिमा रॉड्रिग्ज, स्मृती मंधाना आणि राधा यादव या खेळाडूंना प्रत्येकी ₹२.२५ कोटींचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार (मुंबई) यांना ₹२२.५० लाखांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “आज मंत्रिमंडळ बैठकीत महिला क्रिकेट संघाच्या जागतिक विजयानिमित्त अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील तीन खेळाडूंनी जागतिक स्तरावर भारताचा झेंडा अभिमानाने फडकवला आहे. त्यांच्या या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे. सरकार त्यांच्या सन्मानार्थ विशेष सत्कार सोहळा आयोजित करणार आहे.”
दरम्यान, संपूर्ण भारतीय महिला क्रिकेट संघाचा ५ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विशेष सत्कार केला जाणार आहे.
राज्य सरकारच्या धोरणानुसार —
ऑलिंपिक किंवा पॅरा ऑलिंपिक सुवर्णपदक विजेत्यांना ₹३.७५ कोटी
विश्वचषक सुवर्णपदक विजेत्यांना ₹२.२५ कोटी
प्रशिक्षकांना ₹२२.५० लाख
आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धा सुवर्णपदक विजेत्यांना ₹७५ लाख
बुद्धिबळ ऑलिंपियाड विजेत्यांना ₹१ कोटी पारितोषिक दिले जाते.
नवी मुंबईत झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करून पहिल्यांदाच महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला. या सामन्यात शेफाली वर्मा ‘सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू’, तर दीप्ती शर्मा ‘स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू’ म्हणून घोषित झाली.
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या जागतिक विजयानिमित्त महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील खेळाडूंना गौरव