दि. 27 ऑक्टोबर 2025 | वर्धा
राज्य शासनाच्या वतीने ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध अभियान राबविली जात असून, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. ग्रामपंचायतींनी या अभियानांमध्ये सहभागी होऊन पुरस्काराची रक्कम विकासासाठी वापरावी, असे आवाहन राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बाल विकास) मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले. त्या पिपरी मेघे ग्रामपंचायत सुविधा केंद्र नुतनीकरणाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होत्या.
कार्यक्रमाला राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिज राज्यमंत्री तसेच वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, संजय गाते, वैशाली गौळकर (सरपंच, पिपरी मेघे), गजानन वानखेडे (उपसरपंच), सचिन खोसे, आशिष कुचेवार, अजय गौळकर, सतीश इखार, प्रदिप रौंदळे, संदिप कुत्तरमारे, वंदना शंभरकर, विद्या कळसाईत, वनिता कोठाळे, सागर नेहारे, वैशाली नोहाटे, कुमुद लाजुरकर आणि वैभव चाफले आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, ग्रामपंचायतींना शासनाच्या विविध योजनांद्वारे निधी उपलब्ध होत असून, या योजनांचा प्रभावी वापर करून ग्रामविकास साधावा. पिपरी ग्रामपंचायत शहरालगत असल्यामुळे भूयारी गटार योजनेसाठी प्रस्ताव सादर केल्यास तो तात्काळ मंजूर केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले की, पिपरी मेघे ग्रामपंचायतीच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. ग्रामपंचायतीच्या सर्व समस्यांचे निराकरण करून ती शून्य बिल ग्रामपंचायत करण्यासाठी 16 मेगावॅट सोलर प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. तसेच टाटा कन्सल्टन्सीच्या माध्यमातून कौशल्य विकास केंद्र लवकर सुरु केले जाईल. वाचनालयातील अभ्यासिकेसाठी आवश्यक फर्निचरकरिता निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैशाली गौळकर यांनी केले, तर संचालन विनोद महाजन यांनी केले. कार्यक्रमाला ग्रामपंचायती परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.