वर्धा – आकांक्षा प्रकाशनाद्वारे दि. १ व २ नोव्हेंबर रोजी सेवाग्राम आश्रम परिसरात सहावी राज्यस्तरीय लिहित्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेचे उद्घाटन ‘बाईमाणूस’कार करुणा गोखले यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे राहतील. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रमोद मुनघाटे यांची उपस्थिती राहणार आहे.
जे लिहू इच्छितात त्यांना चालना मिळावी आणि जे लिहिते आहेत त्यांना अधिक प्रोत्साहन मिळावे, या हेतूने ही कार्यशाळा गेल्या अनेक वर्षापासून आकांक्षा प्रकाशनने सुरू केली आहे. यापूर्वी ज्येष्ठ साहित्यिक निरजा, प्रज्ञा दया पवार, उर्मिला पवार, डॉ. यशवंत मनोहर यांनी या कार्यशाळेचे अध्यक्षपद भूषविले आहे. यावर्षी या कार्यशाळेत स्त्रीमुक्ती या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून लेखन करणाऱ्या साहित्यिक करुणा गोखले संवाद साधणार आहेत.
या दोन दिवसीय कार्यशाळेत विविध साहित्यविषयक अभ्याससत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने एखाद्या प्रसंगाची मांडणी व त्या घटनेतून लगेच कथाविस्तार, सोशल मीडियाचा लेखनतंत्राला होणारा फायदा, हितगुज मनीचे, विविध आत्मचरित्रांवर चर्चा तसेच ताराबाईंच्या वादग्रस्त भाषणावर चर्चा अशी वैविध्यपूर्ण सत्रे घेण्यात येतील. कार्यशाळेत आयोजित कविसंमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ कवी बबन सराडकर भूषविणार असून ते काव्यलेखनाबाबत मार्गदर्शनही करणार आहेत.
या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी 9921407479 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कार्यशाळा संयोजक तथा आकांक्षा प्रकाशनच्या सर्वेसर्वा अरुणा सबाने तसेच आयोजन समिती सदस्य धनश्री पाटील, डॉ. वसुधा वैद्य, डॉ. अशोक काळे, डॉ. वंदना महात्मे यांनी केले आहे.
आकांक्षा प्रकाशनचे दोन दिवसीय आयोजनसेवाग्राम येथे सहावी राज्यस्तरीय लिहित्यांची कार्यशाळा