जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीचा दबदबा कायम”15 विरुद्ध शून्य”च्या दाव्याला मतदारांनी दिले प्रत्युत्तर

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसने आपला भक्कम राजकीय पाया पुन्हा एकदा सिद्ध करत भाजपला जोरदार धक्का दिला आहे. “15 विरुद्ध शून्य” असा एकतर्फी निकाल लागेल, या उद्देशाने प्रचाराच्या रणांगणात आत्मविश्वासाने उतरलेले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे राजकीय विमान राष्ट्रवादीच्या शिलेदारांनी प्रत्यक्ष निकालात जमिनीवर उतरवले आहे. मतदारांनी दिलेल्या कौलामुळे सत्ताधारी भाजपच्या अति आत्मविश्वासाला लगाम बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी आपले पारंपरिक बालेकिल्ले शाबूत राखत संघटनशक्ती आणि स्थानिक पातळीवरील संपर्क यांची ताकद दाखवून दिली. अनेक ठिकाणी थेट लढतीत राष्ट्रवादी उमेदवारांनी भाजपच्या प्रभावशाली उमेदवारांना पराभूत करत राजकीय समीकरणे बदलून टाकली. स्थानिक प्रश्नांवर सातत्याने काम, मतदारांशी थेट संवाद आणि विकासकामांचा आढावा या बळावर राष्ट्रवादीने मतदारांचा विश्वास जिंकला.

भाजपकडून मात्र या निवडणुकीत मोठ्या अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या होत्या. विशेषतः ग्रामविकास खात्याची धुरा सांभाळणारे मंत्री जयकुमार गोरे यांनी विकासकामांच्या जोरावर एकतर्फी विजयाचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्ष निकालात हा दावा फोल ठरल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी काट्याच्या लढती झाल्या तर काही ठिकाणी भाजपला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला.

दरम्यान, आंधळी व बिदाल या मतदारसंघांनी भाजपची नामुष्की काही प्रमाणात टाळल्याचे चित्र पाहायला मिळाले. या ठिकाणी भाजप उमेदवारांनी विजय मिळवत पक्षाची पत राखली. तरीही एकूण निकालाच्या पार्श्वभूमीवर अपेक्षित कामगिरी करण्यात भाजपला अपयश आल्याची कबुली स्थानिक पातळीवर दिली जात आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, या निकालाने ग्रामीण भागातील मतदारांचा कल अजूनही स्थानिक नेतृत्व, विकासकामांची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि संघटनात्मक बांधणी यांच्याकडे असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच सत्तेचा प्रभाव असूनही निवडणुका केवळ घोषणांवर जिंकता येत नाहीत, हा संदेशही या निकालातून गेला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये या विजयानंतर उत्साहाचे वातावरण असून पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. तर भाजपसमोर ग्रामीण पातळीवरील संघटन मजबूत करण्याचे आणि स्थानिक प्रश्नांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

या निकालामुळे जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणांवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून दोन्ही पक्षांनी पुढील रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *