आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम

eknath shinde in wardha

                                            – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Ø उपमुख्यमंत्र्यांच्याहस्ते मोतिबिंदू विरहीत वर्धा अभियानाचे उद्घाटन

Ø 18 आरोग्य उपकेंद्र, 50 खाटांच्या क्रिटीकल केअर ब्लॅाक ईमारतीचे भूमिपूजन

Ø अभियानाच्या पहिल्याच शिबिराला रुग्णांचा प्रचंड प्रतिसाद

वर्धा, दि.22 (जिमाका) : मोतिबिंदूचे प्रमाण वाढले आहे. पुर्वी साठ सत्तर वर्षाच्या नागरिकांना मोतिबिंदू व्हायचा, आता पन्नास वर्षाच्या व्यक्तींना देखील हा आजार होतो. या आजाराच्या शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट आणि त्यासाठी देण्यात येणाऱ्या निधीत वाढ करण्याची गरज आहे. वर्धा येथे आयोजित या शिबिरातून मोतिबिंदूच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी आयोजित केलेल्या अशा शिबिरांतून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कामे केले जाते, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

येथील चरखा सभागृहात आयोजित मोतिबिंदू विरहीत वर्धा अभियानाचे जिल्हास्तरीय उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, पालकमंत्री डॅा.पंकज भोयर, आ.राजेश बकाने, भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर, प्रसिध्द नेत्रतज्ञ माजी खासदार पद्मश्री डॅा.विकास महात्मे, पद्मश्री डॅा.तात्याराव लहाने, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, माजी खासदार सुरेश वाघमारे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सरिता गाखरे, किरण पांडव, आरोग्य उपसंचालक शशिकांत शंभरकर, प्रियदर्शनी महिला विकास संस्थेच्या ॲड.शितल भोयर आदी उपस्थित होते.

मानवाचा डोळा म्हणजे दृष्टी आणि जग दाखविण्याचा शरिराचा महत्वाचा भाग आहे. वयोमानाने धुसर झालेल्या या डोळ्याला दृष्टी देण्याचे काम डॅाक्टर करत असतात. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पावन भूमित पालकमंत्री डॅा.पंकज भोयर यांनी अतिशय चांगले शिबिर आयोजित केले आहे, त्यासाठी त्यांचे अभिनंदन करतो. आरोग्य शिबिरांचे आयोजन पुंण्याचे काम आहे. मी मुख्यमंत्री असतांना मुख्यमंत्री सहायता कक्षाच्यावतीने रुग्णांना उपचारासाठी 450 कोटी रुपयांचे सहाय्य केले असल्याचे पुढे बोलतांना श्री.शिंदे म्हणाले.

अलिकडे मोतिबिंदूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अधिक गतीने मोतिबिंदू शस्त्रक्रिया होण्यासाठी शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी अधिक निधीची तरतूद देखील करावी लागेल. यासाठी मुंबईत वेगळी बैठक घेऊन चर्चा करू. राज्यात आरोग्य विषयक विविध कार्यक्रम राबविले जात आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत पुर्वी 1 लाख 50 हजार रुपयांपर्यंतचे उपचार मोफत केल्या जायचे, यात वाढ करून आता 5 लाखांपर्यंतचे उपचार, शस्त्रक्रिया केल्या जात आहे.

राज्य सरकार सर्वसामान्य गरीब नागरिकांचे आहे. गेल्या काही दिवसात लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी अशा अनेक योजना आणल्या. कल्याणकारी योजनांमधून राज्याच्या विकासाला चालना दिली गेली. राज्याला पुढे नेण्याचे काम केले. विकासाच्या बाबतीत मागे असलेल्या जिल्ह्यांना प्रवाहात आणण्याचे काम आमचे सरकार करत असल्याचे श्री.शिंदे म्हणाले.

तुमचे प्रेम मला वर्धेत घेऊन आले

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नागपूर येथून घेऊन येणारे हेलिकॅाप्टर वर्धा येथे पोहोचत असतांना  पाऊस आणि दृष्यमानता नसल्याने नागपूरला परत गेले. त्यानंतर नागपूर विमानतळावरून ते वाहनाने चरखागृह येथे कार्यक्रमस्थळी पोहोचले. वर्धेतील नागरिक, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ आणि शेतकऱ्यांच्या प्रेमाने मला येथे खेचून आणले, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

जनसेवेसाठी मागच्या बाकावरून पुढच्या बाकावर

मी आणि प्रकाश आबिटकर आमदार असतांना पुढच्या बाकावर बसण्याची संधी कधी मिळेल अशी चर्चा करायचो आणि आज पुढच्या बाकावर बसून सेवा करण्याची संधी देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी आम्हाला दिली, असे आपल्या भाषणात पालकमंत्री म्हणाले होते. चांगले काम करणाऱ्यांना नेहमीच चांगली संधी मिळते. जनसेवेच्या कामासाठी मागच्या बाकावरून पुढच्या बाकावर बसविण्यात आले आहे, असे उपमुख्यमंत्री श्री.शिंदे पालकमंत्र्यांच्या भाषणाच्या अनुषंगाने म्हणाले.

वर्धेला आरोग्य सेवेचा उत्तम वारसा – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

कुठेही वैद्यकीय महाविद्यालय नसतांना सेवाग्राम येथे वैद्यकीय महाविद्यालय झाले. पुढे दत्ता मेघे यांनी सावंगी (मेघे) येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरु केले. शिंदे साहेब मुख्यमंत्री असता वर्धेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले. या शहराला आता तीन महाविद्यालये झाली आहे. वर्धेला आरोग्य सेवेचा उत्कृष्ट वारसा लाभला आहे. कोरोनाच्या काळात अनेक जिल्ह्यातील रुग्णांना वर्धेने उत्तम सेवा दिली. आता नव्याने 18 आरोग्य केंद्र मंजूर झाले आहे. आरोग्य सेवा देतांना वर्धा जिल्हा कुठेही कमी पडणार नाही, असे यावेळी बोलतांना पालकमंत्री डॅा.पंकज भोयर म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या काळात वर्धेच्या विकासासाठी चांगले सहकार्य केले. त्यांचे असेच सहकार्य लाभत राहणार आहे. विदर्भात सिंचनाच्या व्यवस्था निर्माण होऊन शेतकऱ्यांना सुखी संपन्न केले जाणार आहे. वैनगंगा नळगंगा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

यावेळी पद्मश्री डॅा.तात्याराव लहाने, पद्मश्री डॅा.विकास महात्मे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी प्रास्ताविक केले. मोतिबिंदू विरहीत अभियानांतर्गत सर्व आठही तालुक्यात शिबिरे घेतली जाणार आहे. दोन लाख रुग्ण तपासणी व पाच हजार शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते जिल्हा सामान्य रुग्णालयातील 50 खाटांचे क्रिटीकल केअर ब्लॅाक नवीन ईमारत बांधकाम, जिल्ह्यात नव्याने मंजूर 18 आरोग्य उपकेंद्र व एका ब्लॅाक पब्लीक हेल्थ युनीटच्या नवीन ईमारतीचे ई-भूमिपूजन करण्यात आले. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून दिव्यांग विद्यार्थीनींना 25 हजार रुपयांचे किसान विकास पत्र, रुग्णांना चश्मे वाटप, अंधकाठीचे वितरण करण्यात आले. प्रियदर्शनी महिला विकास संस्थेच्यावतीने उपमुख्यमंत्र्यांच्याहस्ते उत्कृष्ट कामासाठी डॅा.विकास महात्मे, मंगेश चिवटे, दुर्गा उत्सव समिती व माहेश्वरी नवयुवक मंडळाचा सत्कार करण्यात आला.

सुरुवातीला शिबिरस्थळी लावण्यात आलेल्या दालनांचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी रुग्ण तपासणी, औषधोपचार, चष्मे वाटपाची पाहणी केली. मंत्री संजय राठोड यांनी शिबिरातील स्टॅालवर स्वत:ची रक्तदाब तपासणी केली. शिबिरस्थळी सकाळी 9 वाजल्यापासून नागरिकांनी तपासणीसाठी गर्दी केली होती. प्रशासनाच्यावतीने प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्यात आली. सर्वसामान्य नागरिकांचा मोठा प्रतिसाद शिबिरास लाभला. सदर शिबिराचे आयोजन आरोग्य विभाग, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे, कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम, वर्धा नेत्र चिकित्सा असोशिएशनच्यावतीने करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *